– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार
– केवळ बदनामीच नव्हे तर जातीय व सामाजिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २० जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी व वनरक्षक भरतीची प्रक्रिया राबवताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पदभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी १८ जुलै २०२३ रोजी विधानसभेमध्ये केली. त्या संदर्भात त्याच रात्री ८ वाजताच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून फोन करून तुम्ही आदिवासी असून आदिवासींच्या जीवावर उठलेले आहात अशा प्रकारचे संभाषण करून त्यातील काही निवडक वाक्य संग्रहित करून माझी बदनामी होईल या उद्देशाने ऑडिओ क्लिप समाज माध्यम व सोशल मीडियावर व्हाट्सअपवर टाकून माझी बदनामी करण्याचा व सामाजिक तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
फोनकर्त्याला आपण नाव विचारले असता मी एक मतदार आहे, असे म्हणत त्याने आपले नाव सांगितले नाही. उलट माझी बदनामी होईल या उद्देशाने त्या संभाषणातील काही निवडक वाक्य संग्रहित करून त्याची ऑडिओ क्लिप बनवून मोबाईल वरून इतरत्र सोशल मीडियावर व्हाट्सअपवर पसरवित आहे. मी विधानसभेचा आमदार असून समाजातील सर्वच जातीच्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेले आहेत. त्या सर्वांचे मी प्रतिनिधित्व करीत असल्याने कोणावरही अन्याय होऊ नये या उद्देशाने आपण ओबीसी समाजाची मागणी शासन निर्णयाप्रमाणेच लावून धरली आहे. आदिवासी समाजाचा असूनही आदिवासी समाजविरोधी भाष्य केल्याचा आरोप करून काही लोकांद्वारे जाणीवपूर्वक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसारित करून, जाणीवपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. हा आदिवासी समाज व इतर समाज असा भेद निर्माण करून दोन समाजात भांडण लावण्याचा व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न आहे. त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून, त्यातील सहभागी लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे.