एमएसईबीसमोरील उपोषणाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या यशस्वी शिष्टाईने सांगता

31

– लिंबूपाणी पाजून उपोषणकर्त्यांचे सोडवले बेमुदत ठिय्या आंदोलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शेतकऱ्यांनी कृषी कनेक्शनकरिता डिमांड भरूनही विद्युत कनेक्शन जोडून न मिळाल्याने जेप्रा व गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी गडचिरोली महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ६ जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी त्यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्या आंदोलनाची आपल्या यशस्वी शिष्टाईने यांनी सांगता केली. उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना लिंबूपाणी पाजून आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपोषण सोडविले.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी बोलावले व उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी लवकरच कारवाई करून विद्युत पुरवठा सुरू करण्यासंदर्भात कारवाई केली जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता गाडगे (प्रभार), कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.