तलाठी पदभरतीत जिल्ह्यातील ओबीसी उमेदवारांवरील अन्याय दूर करा

19

– सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची मागणी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज  

गडचिरोली : महाराष्ट्रात तलाठ्यांच्या 4644 जागा भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या 158 जागांपैकी पेसा क्षेत्रातून 151 आणि पेसाविरहित क्षेत्रातून केवळ 7 पदे भरली जाणार आहेत. हा जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवारांवर मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय त्वरित दूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी केली आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

तलाठी पदभरतीत ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आल्याने ओबीसी बांधवांमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्व ओबीसी बांधव एकवटले. हा अन्याय दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपती महोदयांच्या ५ जुलैच्या गडचिरोली दौऱ्यासंदर्भात बैठक सुरु होती. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते. दरम्यान ओबीसी बांधवांचे शिष्टमंडळ दिसताच लोक प्रतिनिधींनी त्यात सहभागी होत जिल्हाधिकारी यांना देऊन ओबीसीवरील अन्यायाबाबत चर्चा केलो.

याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छायाताई कुंभारे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, भाजपाचे रमेश भुरसे, केशव निम्बोड, सुरेश भांडेकर, दादाजी चुदरी, दादाजी छापले, प्रा. देवानंद कामडी, राष्ट्रवादीचे विवेक ब्राम्हणवाडे यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.