शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांना भविष्यवेधी शिक्षणाचे धडे

209

– आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न : प्रशिक्षणात विषयमित्रांचाही सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत शासकीय आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षक यांचे दोन दिवसीय भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण गुरुवारला सुरू झाले. सदर प्रशिक्षणाचा माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेत भविष्यवेधी शिक्षण शैक्षणिक सत्र 2022-23 पासून सुरू झाले आहे. यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणाची उजळणी म्हणून तसेच शिक्षक व विषयमित्र यांना प्रोत्साहित करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

भविष्यवेधी शिक्षण उपक्रमाकडे आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर होते.प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, अपर आयुक्त कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. बन्सोड, वरिष्ठ लिपिक अजय कुहिटे, कनिष्ठ लिपिक एस. एस. पिसाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रशिक्षणास नागपूर जिल्हा परिषद येथील बालरक्षण समन्वयक प्रसेनजीत गायकवाड यांनी भेट दिली. त्यांनी प्रशिक्षणार्थींना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, भैय्याजी सोमनकर, लुमेशा सोनेवाने यांनी भविष्यवेधी शिक्षणाबद्दल मनोगत व्यक्त केले.
या प्रशिक्षणात गडचिरोली प्रकल्पातील गडचिरोली, पोटेगाव, कारवाफा, रेगडी, भाडभिडी, मार्कंडादेव, पेंढरी, सावरगाव, गोडलवाही, रांगी, मुरुमगाव, सोडे, कुरंडीमाल या १३ शासकीय आश्रमशाळेतील ७७ उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मानधन शिक्षक तसेच ५७ विषयमित्र यांचा समावेश आहे. प्रकल्पातील उर्वरित ११ शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक व विषयमित्रांचे प्रशिक्षण शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येंगलखेडा येथे सुरू आहे. 15 व 16 नोव्हेंबरला मुख्याध्यापकांसह पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व विषयमित्रांचे प्रशिक्षण येथे पार पडले.
प्रशिक्षणात सुलभक म्हणून गणित विषयासाठी माध्यमिक शिक्षक के.बी.बेझलवार, इंग्रजी विषयासाठी उच्च माध्यमिक शिक्षक आर. टी. मोहिते, मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शिक्षक ए. पी. गेडाम तसेच प्राथमिक शिक्षक ए. बी. गणवीर मार्गदर्शन करीत आहेत. यापूर्वी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच जून महिन्यात आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना भविष्यवेधी शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
जागतिक दर्जाचे स्वीकार्यता असणारे, भविष्यासाठी तयार असणारे विद्यार्थी विकसित करणे, १०० टक्के मुलांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग करणे, २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाणारे व कौशल्य अवगत असणारी मुल तयार करणे ही या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, मुलांना शिकण्यास आव्हान देणे, विषयमित्र तयार करणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, एक तृतीयांश वेळात पाठ्यक्रम पूर्ण करणे, मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आदी सहा पायऱ्या भविष्यवेधी शिक्षणाच्या आहेत.