पूरपरिस्थिती व पावसामुळे हरांबा परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान

112

– शेत मशागतीचा खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल

– नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शेजारील चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हरांबा व परिसरातील गावात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे धान पिकांसह इतर विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याकडे शासन व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हरांबा व परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अशातच गोसेखुर्द धरण व संजय सरोवराचे दरवाजे कालपासून उघडण्यात आल्याने विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच वैनगंगा नदीला पूर आल्याने हरांबा, उमरी, कढोली, डोनाळा, लोंढोली, साखरी व परिसरातील पिके पाण्याखाली आली आहेत. संततधार पाऊस व पूरपरिस्थितीमुळे धान रोवणी, धान आवत्या, तूर, तीळ, सोयाबीन, कापूस आदी विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याकडे शासन व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.