– आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नाला यश
– मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे प्रथम प्राधान्याने मंजूर करावे, त्यानंतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा विचार करण्यात यावा, अशी वारंवार मागणी करणारे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १०० टक्के होईल याबाबत आमदार महोदयांना आश्वस्त केले.
गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी मागील काही महिन्यापासून सातत्याने मंत्र्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आग्रह करीत होते. त्यांनी जिल्ह्यात प्रथम मेडिकल कॉलेजची आवश्यकता का आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांना सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी सुध्दा पाठिंबा दिला. याबाबत त्यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. गडचिरोली येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यापूर्वी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. आपल्या मागणीची नक्कीच दखल घेतल्या जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु काल जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आढावा बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांनी मेडिकल कॉलेज उभारणी गडचिरोली जिल्ह्यात करण्यात येईल, अशी घोषणा केली व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्याबद्दल प्रशंसा केली. यावेळी आमदार महोदयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तमाम जिल्हा वासिय जनतेच्या वतीने आभार मानले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सदर मुद्द्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून देणारे पत्रकार बांधव यांचे आभार मानले व सदर मागणी पूर्तताबद्दल गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे जनतेच्या वतीने आभार मानले जात आहे.