Home गडचिरोली शेतातून 27 लाखांचा गांजा जप्त

शेतातून 27 लाखांचा गांजा जप्त

7

– अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात

– स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे धानोरा येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात अवैध कारवायांना आळा घालून सूरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष निर्देश पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी दिले आहेत. याकरिता अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवाया करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देखील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीसांकडून 6 मे 2026 रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन धानोरा हद्दीमध्ये मौजा परसवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, 4 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा परसवाडी येथील इसम नामे मोरेश्वर हिरामण उसेंडी, वय 58 वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली याने त्याचे शेतशिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे, अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मौजा परसवाडी येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम नामे मोरेश्वर हिरामण उसेंडी, वय 58 वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली यांचे शेतात पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या शेताचे पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या शेतात अमली पदार्थ (गांजा) ची लहान-मोठे झाडे लागवड केलेले मिळून आले.

सदर ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, शेतात लागवड केलेला एकूण 54.5 कि.ग्रॅ. वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) प्रति किलो 50,000/- रुपये प्रमाणे एकुण 27,25,000 रु. (सत्ताविस लाख पंचविस हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी नामे मोरेश्वर हिरामण उसेंडी, वय 58 वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन धानोरा येथे 5 मे 2026 रोजी अप. क्र. 62/2026, कलम 8 (क), 20 (ब) (त्त्) 20 (क) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे धानोरा येथील पोउपनि. टेभुर्णे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा/943 सुधीर दंडीकेवार, पोना/5408 धनंजय चौधरी, पोअं/3951 प्रशांत गरफडे, पोअं/420 रोहित गोंगले, चालक पोअं/8092 संदीप भेंडारे तसेच पोस्टे धानोराचे सपोनि. प्रशांत जंगले व अंमलदार यांनी पार पाडली.

error: Content is protected !!