Home गडचिरोली पेसा मोबिलायझर्स पद रद्द निर्णयाविरोधात पुण्यात आज राज्यस्तरीय आंदोलन

पेसा मोबिलायझर्स पद रद्द निर्णयाविरोधात पुण्यात आज राज्यस्तरीय आंदोलन

14

– गडचिरोलीतून शेकडो महिला होणार सहभागी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पेसा ग्रामसभांमधील मोबिलायझर्स मंजूर पदे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे येथे आज, ६ मे रोजी राज्यस्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. या आंदोलनात सिटूचे कॉ. अमोल मारकवार, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत.

पंचायतराज संचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या या अन्यायकारक व कामगारविरोधी निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येणार आहे. पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, हा निर्णय तत्काळ मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील पेसा मोबिलायझर्स मोठ्या संख्येने आज, ६ मे रोजी पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे. पेसा मोबिलायझर्स पद रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, सर्व मोबिलायझर्सना पुन्हा कामावर घ्यावे, आदिवासी भागातील रोजगार आणि हक्क अबाधित ठेवावेत आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीने राज्य सरकारला इशारा देत सांगितले आहे की, आदिवासी व कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय सहन केले जाणार नाहीत.

error: Content is protected !!