दोटकुली रेतीघाटावर पोकलँडद्वारे सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू

170

– प्रशासन अंधारात, रेतीघाटावर मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील दोटकुली रेतीघाटावर पोकलँडद्वारे सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. शिवाय सदर रेतीघाटावर मोठ्या प्रमाणावर रेतीची साठवणूक करून ठेवण्यात आल्याचा खळबळजनक व धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मात्र याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नसून प्रशासनच अंधारात असल्याने जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रेतीघाटाचा लिलाव झाल्यानंतर त्या रेतीघाटावरील रेतीचे उत्खनन शासनाच्या नियमानुसार मशनरीच्या माध्यमातून करता येत नाही. मात्र चामोर्शी तालुक्यातील दोटकुली रेतीघाटावर रेतीचा उपसा करण्याकरिता सर्रासपणे पोकलँड या मशीनचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटावरील रेती उत्खननाची मुदत 8 ते 10 जून 2022 रोजीच संपली असल्याची प्रशासनाची माहिती आहे. असे असतानाही स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेवून दोटकुली नदीघाटावर पोकलँडद्वारे रेतीचा सर्रासपणे उपसा सुरू आहे.

दोटकुली रेतीघाटावरील रेती उत्खननाची मुदत संपल्याची माहिती असून रेती उत्खननासंदर्भात वाढीव मुदत मिळाल्याचे लेखी पत्र स्थानिक प्रशासनाला मिळाले नसल्याची माहिती आहे. असे असतानाही दोटकुली रेतीघाटावर पोकलॅन्डद्वारे सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू असल्याने जनसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारसंदर्भात प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी श्री. उत्तम तोडसाम यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, रेतीघाटावरील रेतीचा उपसा करण्यासाठी पोकलँडचा वापर संबंधितांना करता येत नाही, तशा प्रशासनाच्या सूचना आहेत. याबाबत संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रेतीघाटावरील रेती उत्खननाकडे लक्ष ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या रेतीघाटावरील रेती उत्खननाबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

– श्री. उत्तम तोडसाम, उपविभागीय अधिकारी चामोर्शी.

याबाबत चामोर्शी येथील तहसीलदार श्री. संजय नागटिळक यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रशासनाच्या सूचनेनुसार कोणत्याही रेतीघाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी पोकलँड मशीनचा वापर करता येत नाही. यावर लक्ष्य ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगण्यात आले आहे. यानंतरही पोकलँडद्वारे आणि मुदतीनंतर रेतीचा उपसा करण्यात येत असल्यास याबाबीची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

– श्री. संजय नागटिळक, तहसीलदार चामोर्शी.