नर्सेस जनआरोग्याचा महत्त्वाचा कणा : धनाजी पाटील

85

– चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये टॅलेन्ट कॉन्टेस्ट स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : समाजात जनआरोग्याचे संवर्धन नर्सेसवर अवलंबून असून नर्सेस या जनआरोग्याचा महत्त्वाचा कणा आहे. कोरोना काळात त्यांच्या सेवेचे महत्व हे सर्वतोपरी असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे
नर्सिंग क्षेत्राकडे पाहण्याचा समाजाचा कल बदलला आहे. नर्सेसशिवाय आरोग्य विभाग पंगू असून नर्सिंग सेवा सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. विद्यार्थिनींनी नर्सिंग अभ्यासक्रमात प्राविण्य मिळवून समर्पित भावनेने समाजाची सेवा करावी, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले.

धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुंडटस् असोसिएशन द्वारा टॅलेन्ट कॉन्टेस्ट (नृत्य स्पर्धा), वनौषधी लागवड- संवर्धन प्रक्रिया, बाजारपेठ यावर मार्गदर्शन व मोफत रोगनिदान, औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ऍड. रामभाऊ मेश्राम होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रसिद्ध अधिवक्ता (फौजदारी) ऍड. चंद्रराजजी पांडे, डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघ गडचिरोलीचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, वामनराव सावसाकडे, कुणाल पेंदोरकर, शरद गिरीपुंजे, डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने, चातगावचे सरपंच गोपाल उईके, चातगावचे माजी सरपंच नारायण सय्याम आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना ऍड. रामभाऊ मेश्राम म्हणाले, नर्सेसचे ऋण न फिरणारे आहे. नर्सेस या त्यागाची मूर्ती आहे. त्यांच्या सेवेमुळेच सामाजिक आरोग्याचे संतुलन सांभाळल्या जात आहे. साळवे नर्सिंग कॉलेजमुळे अनेक आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थिनींचे जीवनमान उंचावले आहे. या जिल्ह्यातील जवळपास 800 विद्यार्थिनींना आरोग्य शिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही फार मोठी उपलब्धी असून हेच मोठे समाजकार्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन विविध शासकीय योजनांची माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य शिक्षणाचा अभाव असताना या नर्सिंग काॅलेजमुळे आरोग्य शिक्षणाचा पाया रोवला गेला आहे. आज या संस्थेचे रुपांतर वटवृक्षात झाले असल्याचे ते म्हणाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक कार्यातून समाज प्रबोधन व्हावे अशा उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा रामटेके यांनी केले. संचालन स्टुडंट्स नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष निकिता रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन कोमल वाकोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. साळवे नर्सिंग काॅलेजच्या प्राचार्या दिप्ती तादुरी, उप प्राचार्या स्वागता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी सहकार्य केले.