– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित
– नाशिक येथे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्थानिक नवेगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रतिभाताई चौधरी यांना कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथे २ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रतिभाताई चौधरी यांचा प्रशस्तीपत्र, ५० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व प्रगतशील शेतकरी महिला म्हणून साडीचोळी तसेच हळदी-कुंकवाचा करंडा देवून सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील एक प्रगतशील शेतकरी म्हणुन प्रतिभाताई चौधरी यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेवका वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर, निताताई उंदीरवाडे, अल्काताई पोहनकर, कोमल बारसागडे, रोषनी बानमारे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.