जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या कृषिपंपासंदर्भात गडचिरोली येथे बैठक घेणार

140

– आमदार कृष्णा गजबे यांच्या तारांकीत प्रश्नाला उर्जा राज्यमंत्र्यांचे उत्तर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली सन 2018-19 पासून जिल्ह्यात 4138 शेतकऱ्यांनी कृषिपंप विज जोडणीसाठी अर्ज डीमांड भरले. माञ केवळ 1374 शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली असून 2764 शेतकरी कृषि पंपाच्या विज जोडणीपासून वंचित ठेवल्याबाबत तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला असता सदर प्रश्नाला उत्तर देत कृषीपंप विज जोडणी संदर्भात गडचिरोली येथे बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात डिमांड भरुन तीन वर्षाचा कालावधी लोटला असताना अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतक-यांना कृषी वीज जोडणीपासून वंचित ठेवले. याबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला असता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही समर्थन देत ऊर्जा मंत्र्यांना गडचिरोली जिल्ह्यातील डीमांड भरुनही कृषी पंपांच्या प्रलंबित विज जोडण्या देण्याची मागणी केली.
उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना उर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे यांनी कृषीपंप विज जोडणी धोरण -2020 अंतर्गत स्थानिक तालुका, जिल्हा पातळीवर उपलब्ध असलेल्या एसीएफ निधी वापराचे सर्व अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले असून निधी उपलब्धते नुसार शेतकऱ्यांना विज जोडण्या देण्यात येणार असल्याचे सांगितले.यावर आमदार महोदयांचे समाधान झाले नसल्याने त्यावर गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित कृषि पंप विज जोडणी विषयावर बैठक घेऊन समस्येचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले.
एकंदरीत मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विज समस्येबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे सभागृहात दिवसभर केवळ विज समस्येवर चर्चा होऊन भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व आमदार अत्यंत आक्रमक झाले. सरकार कडून कोणतेही ठोस उत्तर न आल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ होवून विज प्रश्नावर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
आमदार कृष्णा गजबे यांनी अधिवेशनात आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कृषिपंप विज जोडणी विषयावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.