आधारभूत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात येणार : आमदार गजबे यांच्या तारांकीत प्रश्नाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे उत्तर

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी करुनही धान विक्रीपासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांंसाठी आधारभूत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सकारात्मक उत्तर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या तारांकित प्रश्नाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना. छगन भुजबळ यांनी दिले.
आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील नागरिक केवळ शेती व्यवसावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने राज्य शासनाच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या नोडल एजन्सीच्या आधारभूत खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांकडील धान आधारभूत दराने खरेदी करण्यात येतो.
याकरिता केंद्र सरकारने द ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिलेली आहे. परंतु राज्य शासनाने केवळ १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत दिल्याने जिल्ह्यातील आँनलाईन नोंदनी करून टोकन प्राप्त केलेल्या शेतक-यांपैकी अनेक शेतकरी धान विक्री पासून वंचित आहेत. देसाईगंज तालुक्यात ५८०० शेतकऱ्यांनी नोंदनी केली. त्यापैकी ३८५० शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले असून १९५० शेतकरी अजुनही धान विक्री पासून वंचित राहिलेले आहेत.
याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी यापूर्वी शिल्लक राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना धान विक्रीकरिता आधारभूत धान खरेदीला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची निवेदनातून मागणी केलेली होती. परंतु मागणी पूर्ण झाली नाही. करिता आमदार कृष्णा गजबे यांनी अधिवेशनात संसदीय आयुधाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला जाईल असाही इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा सभागृहात आमदार कृष्णा गजबे यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करून आधारभूत धान खरेदी प्रक्रियेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची जोरदार मागणी केली. या मागणीला आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी समर्थन देत मंत्री महोदयांना मुदतवाढ देण्याची विनंती केली. सदर प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आँनलाईन नोंदनी करूनही धान विक्रीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी आधारभूत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात येईल असे, आश्वासन दिले.
तद्नंतरही आमदार गजबे यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वार महोदयांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी लवकर शासन आदेश काढण्याची विनंती केली.त्यावरही मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली. आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी मुदतवाढीचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून निकाली काढण्यात मौलिक भुमिका बजावल्याने आँनलाईन नोंदनी करूनही आधारभूत धान विक्रीपासून वंचित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यास्तव आरमोरी मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त करु लागले आहेत.