शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या तत्काळ करा : विधानसभेत आमदार डॉ. देवरावजी होळी यांची सरकारकडे मागणी

123

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या तारांकित प्रश्नाला मंत्री महोदयांनी दिले उत्तर

– २०१८-१९ पासून आतापर्यंतच्या प्रलंबित वीज जोडण्याचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या का ?

– निविदा प्रक्रियेच्या ३३-३३-३४ चा रेशोचे पालन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील २७६४ कृषी पंपाच्या प्रलंबीत वीज जोडण्याचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या का ? असा प्रश्न करीत आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या प्रलंबीत वीज जोडण्या तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली.
यावेळी मंत्री महोदयांनी वीज जोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगत लवकर जोडण्या करण्यात येतील, असे आश्वस्त केले.

गडचिरोली जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये २२९ वीज जोडणी प्रलंबित होती, त्यानंतर सन २०१९-२० मध्ये ३६३, सन २०२०-२१ मध्ये ११०१, तर सन २०२१-२२ मध्ये १०७१, अशा २७६४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज जोडण्याचे काम प्रलंबित आहेत. कंत्राटदारांना निवीदा प्रक्रियेच्या माध्यमातून काम देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत जोडणी प्रलंबित आहेत. अशा प्रकारच्या निविदा प्रक्रियेच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ३३ % मजुर सहकारी संस्था, ३३% सुशिक्षित बेरोजगार अभियंते व ३४ % सर्वसाधारण असा निविदा प्रक्रियेचा शासन निर्णयाचा रेशो आहे. मात्र या निविदा प्रक्रियेच्या ३३-३३-३४ च्या रेशोचे पालन वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होत नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन करण्यात येत आहे किंवा नाही याबाबत शासनाने नोंद घेवून त्याची चौकशी करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या प्रलंबीत वीज जोडण्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून सरकारकडे केली.