Home गडचिरोली टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

28

– गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी

– 21 किमी हाफ मॅरेथॉनमधील महिलांच्या 18 ते 24 या वयोगटात प्रियंका ओक्सा हिने पटकाविले द्वितीय क्रमांक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने, गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील 18 युवक-युवती व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आज, 18 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथे होत असलेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये 21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन) मॅरेथॉनकरिता सहभाग नोंदविला.

मुंबई येथे दरवर्षी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्रातील अतीदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी 68 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी निवड करण्यात आलेल्या युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहीत्य (ट्रॅकसुट, शुज) वाटप करुन तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य सरावाचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धमध्ये 21 किमी. गटात गडचिरोली पोलीस दलाचे सपोनि. गंगाधर गायकवाड, मपोअं/टिंकु चलाख, पोअं/मडावी व प्रशिक्षणार्थी श्रेयस वाढई, अतुल गोटा, राजु पातरगड्डा, रमेश मडावी, अविनाश पदा, आदित्य मिटलामी, दिनेश पिट्टा, नयन गुरनुले, निखिल गुरनुले, गणेश गोटा, उमेश मट्टामी, ईश्वर तुलावी यांनी सहभाग नोंदविला. यासोबतच 21 किमी हाफ मॅरेथॉनमधील महिलांच्या 18 ते 24 या वयोगटात प्रियंका ओक्सा हिने द्वितीय क्रमांक तसेच संपूर्ण महिलांमध्ये चौथा क्रमांक व पूर्ण हाफ मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांमध्ये 53 वा क्रमांक पटकाविले. तसेच कार्तिक भांडेकर याने 18 ते 24 या वयोगटात 21 किमीमध्ये 1 तास, 39 मी. 03 सेकंदमध्ये मॅरेथॉन पूर्ण करुन 19 वा क्रमांक व संदिप उसेंडी याने 25 ते 29 या वयोगटात 1 तास, 39 मी. 05 सेकंदमध्ये 22 वा क्रमांक पटकाविला.

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीचे युवक सहभागी झाले यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार तसेच प्रशिक्षक श्रेणी. पोउपनि/जांगी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!