विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तालुक्यातील पारडी (टोली कुपी) येथे युवा फ्रेंड्स ग्रुप कबड्डी क्लब पारडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते फीत कापून अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.
उद्घाटन समारंभात उपस्थित खेळाडू व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मा. खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “ग्रामीण भागात कबड्डीसारखा मातीतला खेळ मोठ्या उत्साहाने आयोजित केला जात आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. खेळाडूंनी राष्ट्रभावना, शिस्त आणि प्रामाणिक खेळसंस्कृती जपत मैदानात उतरावे. विजय-पराजयापेक्षा खेळभावना अधिक महत्त्वाची आहे.” कबड्डी स्पर्धेसाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी गावातील देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून निवड झालेले जवान सुरज भोयर तसेच पोलीस दलात नियुक्त झालेले जवान विक्की सुत्रपवार यांचा मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जवानांचे अभिनंदन केले. त्यानंतर मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना प्रोत्साहन दिले. टॉस करून सामन्याचा आनंद लुटला.
या भव्य कबड्डी कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, डॉ. धम्मदीप बोदेले, भाजपा युवा नेते निखिल सुंदरकर, परमानंद पुन्नमवार, ॲड. मिलिंद लाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर गेडाम, जितेंद्र भांडेकर, प्रशांत कोटगले, संजय गंडाटे, निखिल सहारे, अमोल गद्दमवार, दीपक ठाकरे, तुषार रामटेके, अरुण म्हशाखेत्री, सुनील भोयर, मंडळाध्यक्ष वेदांत लोंढे, गौरव भोयर, प्रविण गेडाम, धनराज गंडाटे यांच्यासह गावातील नागरिक, युवक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण क्रीडासंस्कृतीला चालना देणारा हा कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.







