– समस्या निस्तारण्याची सरपंच व उपसरपंच यांच्याकडे गावकऱ्यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : ग्रामपंचायत मुरखळा (नवेगाव) ही जिल्हा मुख्यालया लगतची मोठी ग्रामपंचायत असून येथे मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे आतातरी गांभीर्याने लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी सरपंच दशरथ चांदेकर व उपसरपंच राजू खंगार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने यापूर्वी नियमितपणे कचरा संकलन सुरू होते. मात्र घनकचरा डम्पिंग यार्डमुळे दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक नागरिकांनी सदर डम्पिंग यार्ड बंद पाडले आहे. परिणामी मागील एक महिन्यापासून कचरा संकलन पूर्णतः बंद असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाची पर्यायी जागा उपलब्ध करून कचरा संकलन सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच ग्रामपंचायतीच्या काही भागात पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर पाणी पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बहुतांश भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य ठिकाणी नाल्यांची व्यवस्था नसल्याने अनेक वॉर्डामध्ये दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सांडपाण्याची कायम स्वरुपी व योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
सदर समस्यांकडे ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
तसेच सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात येईल, असाही इशारा जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या सहसचिव कविता विलास उराडे, माजी ग्रामपंचायत सदस्या सिंधू यमाजी कावळे, उत्तरा अशोक हजारे, आम्रपाली रामटेके, विद्या शेंडे, अश्विनी लोणारकर, सोनी कुशवाह, पल्लवी लोणारकर, अनुसया शेंडे, कोमल शेंडे, सविता सिकदार, अनिता कन्नाके, कौशल्याबाई बावनथडे यांनी मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतचे सरपंच दशरथ चांदेकर आणि उपसरपंच राजू खंगार यांना निवेदनातून दिला आहे.
सदर समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येतील आणि समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन उपसरपंच राजू खंगार यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे.







