Home गडचिरोली गरंजी टोला येथील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

गरंजी टोला येथील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

61

– 92 आरोपींना ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल

– 46 दूचाकी व 5 चारचाकी वाहनांसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी हद्दीतील गरंजी टोला जंगल परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर गडचिरोली पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरून 92 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईत 46 दुचाकी व 5 चारचाकी वाहनांसह एकूण 44 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्या कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्रातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार भरविण्याचा प्रयत्न जूगार खेळणाऱ्यांकडून केला जात असतो. असे अवैध कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर पैज लाऊन जुगार  खेळणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहे. यावरुन 21 सप्टेंबर रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोस्टे रेगडी हद्दीतील गरंजी टोला येथे अवैधपणे सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर धाड टाकण्यात आली.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, 21 सप्टेंबर 2025 रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोस्टे रेगडी हद्दीतील गरंजी टोला जंगल परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील तीन पथके माओवादीविरोधी अभियान राबवित असताना गरंजी टोला जंगल परिसरात काही इसमांचा मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने पोलीस पथकातील अधिकारी व जवानांनी जवळ जाऊन सदर बाबत खात्री केली असता, त्या ठिकाणी काही इसम कोंबड्यांची झुंज लाऊन, त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. याबद्दल वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांच्या परवानगीने पोस्टे रेगडी येथील पोलीस पथकाची योग्य त्या साहित्यानिशी दोन शासकिय पंचांसह कायदेशिर मदत घेऊन विशेष अभियान पथकातील अधिकारी व अंमलदार आणि पोस्टे रेगडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे धाड टाकली असता, धाडीदरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला होता.

सदर कारवाईदरम्यान पोलीसांनी घटनास्थळावरुन एकूण 92 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील एकूण 46 नग जुन्या वापरत्या मोटारसायकल अंदाजे एकूण किंमत 16,10,000 रुपये, 5 नग जुने वापरते चारचाकी वाहन एकूण किंमत 26,00,000 रुपये, 31 जुने वापरते मोबाईल फोन अंदाजे एकूण किंमत 1,70,000 रुपये, 14 नग कोंबडे अंदाजे एकूण किंमत 3,200 रुपये, 5 नग लोखंडी काती अंदाजे एकूण किंमत 250 रुपये, एकूण 42,950 रुपये रोख रक्कम अशा वर्णनाचा एकूण 44,26,400 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने नमूद 92 आरोपींवर पोस्टे रेगडी येथे अप क्र. 26/2025 कलम 12 (ब) महा. जुगार अधिनियम सहकलम 11 (फ) (न) प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे रेगडीचे पोउपनि. कुणाल इंगळे हे करीत आहेत.

सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे व विशेष अभियान पथकाचे सपोनि. विश्वास बागल, पोउपनि. ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि. देवाजी कोवासे व अंमलदार यांनी पार पाडली.

error: Content is protected !!