– ॲड. वामनराव चटप यांची पत्रपरिषदेत माहिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी देशातील स्वातंत्र्याच्या लढाईतील घटनेच्या आधारे क्रांतिदिनी शनिवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत नागपूर येथील संविधान चौकात “महाराष्ट्रवादी व विदर्भ विरोधी चले जाओ” या स्वरूपाचे ‘निदर्शने आंदोलन’ करणार येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी बुधवार (ता. ६) येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत माहिती देताना ॲड. चटप पुढे म्हणाले की, घटनेतील आर्टिकल ३ प्रमाणे केंद्र सरकारने ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य’ तत्काळ निर्माण करावे. यासाठी आंदोलन तीव्र करण्याच्या हेतूने ‘महाराष्ट्रवादी व विदर्भ विरोधी चले जाओ’ या आंदोलनाचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असून राज्याचे महसुली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३ कोटी रुपये आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यावर कर्जाचा डोंगर ७ लाख ८२ हजार कोटी व त्या कर्जावर घ्याव्या लागणाऱ्या कर्जाचा बोजा ५६ हजार ७२७ हजार कोटी रुपये होता. महाराष्ट्र सरकारने बजेट मंजुरीनंतर घेतलेल्या कर्जाची राशी ही १३ हजार कोटी रुपये असून भविष्यातील राज्याच्या आर्थिक गरजा भागविण्याकरिता केंद्र सरकारला १ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे परत कर्ज घेण्यास परवानगी मागितली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर व व्याजाचा बोझा एकूण ९ लाख ८३ हजार ७८७ कोटी रुपये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार विदर्भाचा ६० हजार कोटी रुपयांचा सिंचनाचा अनुशेष व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, रस्ते, पिण्याचे पाणी, ग्रामविकास, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचा १५ हजार कोटी रुपयाचा अनुशेष असा एकूण ७५ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यास असमर्थ आहे.
राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे असल्यामुळे तो अनुशेष भरून निघणे कदापीही शक्य नाही. त्यामुळे विदर्भाची सिंचन क्षमता कदापि वाढू शकत नाही. परिणामी शेतकऱ्याच्या आत्महत्याचे सुरू असलेले सत्र थांबू शकत नाही. दरडोई उत्पन्न तिळमात्रही वाढण्याची शक्यता नसल्यामुळे, जटील असलेला कुपोषणाचा व त्यामुळे होणारे गर्भारमाता व बालमृत्यू यांचेही परिणाम कमी होऊ शकत नाहीत. प्रदूषण नियंत्रित करण्याकरिता औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अद्यावत मशीनरी लाऊन ते प्रदूषण नियंत्रित करणे अशक्यप्राय झाले आहे. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तरुणांचा सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असलेल्या नक्षलवादाकडे असलेला वाढता कल नियंत्रित होऊ शकत नाही. तसेच बेरोजगारांचे स्थलांतरही उद्योगाअभावी थांबू शकत नाही. परिणामी विदर्भातील बेरोजगारांचे स्थलांतर रोखण्यात महाराष्ट्र शासनाला अपयश आल्यामुळे विदर्भातील कमी झालेले ४ आमदार व १ खासदार अशी लोकप्रतिनिधीची संख्याही वाढण्याची तिळमात्रही शक्यता नाही. म्हणून वैदर्भीय जनतेकरिता “विदर्भाचे स्वतंत्र राज्य” हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तीव्र करण्याकरिता व केंद्र सरकारने यथाशिघ्र याबाबत निर्णय घ्यावा म्हणून ९ ऑगस्टचे “महाराष्ट्रवादी व विदर्भ विरोधी चले जाओ आंदोलन” असल्याचे सांगितले आहे.
विदर्भ राज्याची मागणी पूर्व विदर्भात गावा-गावांत पोहचविण्याच्या हेतूने व पूर्व विदर्भात आंदोलनाची धग व तिव्रता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्व विदर्भाचा ‘विदर्भ निर्माण संकल्प मेळावा’ रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथील यशोदा सभागृहात १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील विदर्भवादी जनतेने या मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहनही ॲड. चटप यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर (मरकाम), जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, दक्षिण गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जुम्मन शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





