– आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या घोषणेनंतर आदेश धडकले
– विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या दु.१२.४५ च्या वेळेवर मात्र शिक्षक, पालक व विद्यार्थी नाराज
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०५ या वेळात भरविण्याचा सुधारित आदेश आदिवासी विकास विभाग मंत्रालयातून मंगळवार, २५ फेब्रुवारीला निर्गमित झाल्याने आता वेळापत्रकावरून राज्यात निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर झाली आहे.
यापूर्वी ३ फेब्रुवारीला निर्गमित झालेल्या आदेशात आश्रमशाळेची वेळ सकाळी ९.४५ ते ५.१० अशी केली होती. चूक दुरुस्ती झाल्याने सिटू संघटनेच्या संघर्षाला अखेर यश आले. परंतु या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची वेळ दुपारी १२.४५ ते १.४५ असल्याने संघटना, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये जेवणाच्या वेळेवरून नाराजीचा सुर उमटत आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी ९.४५ वाजता करावी, अशी मागणी सिटू संघटनेने केली आहे.

आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर हे चार विभाग असून राज्यातील ३० प्रकल्पात ४९७ शासकीय तर ५५३ अनुदानित असे एकूण १ हजार ५० आश्रम शाळा आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली, अहेेरी व भामरागड असे नऊ प्रकल्प कार्यालय असून नागपूर विभागात ७७ शासकीय तर १३१ अनुदानित असे एकूण २०८ आश्रमशाळा आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात ४३ शासकीय व ४६ अनुदानित असे एकूण ८९ आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रम शाळा आता सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०५ या वेळात तर शनिवारला सकाळी ७.४५ ते ११.५५ पर्यंत भरणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचे सहसचिव वि. फ. वसावे यांनी ३ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशासोबत जोडलेल्या शालेय वेळापत्रकामध्ये आश्रमशाळा सकाळी ९.४५ वाजता भरविण्याची वेळ दिली होती. सदर चूक लक्षात आल्याने चुकीची दुरुस्ती करून सह सचिव वि. फ. वसावे यांनी आता सुधारित वेळापत्रक २५ फेब्रुवारीला निर्गमित केले आहे.
सिटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून दोन सत्रातील अन्यायकारक व गैरसोयीचे वेळापत्रक बदलवून आश्रमशाळा पूर्ववत ११ ते ५ या वेळात भरविण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी २३ ऑगस्ट २०२३ व ८ जुलै २०२४ रोजी दोनदा मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात आश्रमशाळेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले होते. वेळापत्रक बदलविण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर देखील काळ्या फिती लावून बहिष्कार घातला होता. वेळोवेळी शासनस्तरावर व वरिष्ठ कार्यालयात निवेदनेही दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष प्रा. प्रमोद पोगेरे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्या नेतृत्वात वेळापत्रक बदलविण्याची मागणी लावून धरली होती.
नागपूर येथे ३ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या नेतृत्वात महिला आघाडी प्रमुख करुणा लांजेवार, राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, भामरागड प्रकल्प अध्यक्षा सुरेखा तेलतुंबडे, नागपूर प्रकल्प अध्यक्षा वनिता गेडाम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलविण्यासाठी निवेदन सादर केले होते हे येथे उल्लेखनीय आहे. वेळापत्रक बदलल्याबद्दल सिटू संघटनेने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह राज्य शासनाचे व सहकार्यासाठी पत्रकारांचे आभार मानताना विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ मात्र गैरसोयीची असल्याचे म्हटले आहे.







