विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी नागपूर येथील क्रीडांगणावर ३ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहेत. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या मैदानावर नागपूर विभागातील खेळाडूंच्या क्रीडा सराव शिबिराचे आयोजन केलेले आहे. या सराव शिबिरासाठी गडचिरोली प्रकल्पाचे ३० मुले व ३७ मुली असे एकूण ६७ खेळाडू शनिवारला रवाना झाले.
बसने खेळाडू रवाना होताना गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. आदिवासी विकास नागपूर विभागाकडून हे खेळाडू खेळणार आहेत. आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नागपूर, नाशिक, ठाणे व अमरावती या चार विभागांचा समावेश राहणार आहे. नागपूर विभागात नागपूरसह गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, वर्धा, देवरी व भंडारा या ९ प्रकल्पांचा समावेश आहे.
खेळाडू रवाना होताना प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर यांच्यासह क्रीडा शिक्षक उपस्थित होते. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे या वैयक्तिक खेळासाठी खेळाडूंचा कसून सराव करून घेण्यात येणार आहे.







