गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या दोन नगरसेविकांचे नामांकन दाखल : ९ डिसेंबरला होणार निवडणूक

199

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून अल्का पोहनकर व पूजा बोबाटे यांनी आज, ३ डिसेंबर रोजी नामांकन दाखल केले असून अल्का पोहनकर यांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निवडणुकीकडे गडचिरोली शहर व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

सन २०१६ च्या निवडणुकीत थेट जनतेमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अवघा महिनाभराचा कालावधी बाकी असताना एका प्रकरणात नगरविकास विभागाने त्यांना अपात्र ठरविल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज, ३ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्याचा अवधी देण्यात आला होता. या पदासाठी बहुमत असलेल्या भाजपाकडून अल्का पोहनकर व पूजा बोबाटे यांनी नामांकन दाखल केले. छाननीअंती दोन्ही सदस्यांचे नामांकन पात्र ठरले आहेत. येत्या ९ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा घेऊन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामधून नगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. बहुमतात असलेल्या भाजपाकडून पोहनकर व बोबाटे यांचे नामांंकन दाखल असून यापैकी कोण नामांकन मागे घेणार हे ७ डिसेंबरला स्पष्ट होईल. असे चित्र असले तरी अल्का पोहनकर यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.