जनतेला आणखी किती दिवस वेठीस धरणार : डॉ. प्रमोद साळवे यांचा सवाल

82

गडचिरोली : सध्या एसटी कर्मचार्‍यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेला एसटी कर्मचार्‍यांविषयी पूर्णपणे सहानुभूती असतानाही एसटी कर्मचारी ज्या पद्धतीने संप चालवित आहेत. हे पाहून त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नसून केवळ स्वत:च्या कल्याणाविषयी चिंता आहे. ऐन दिवाळी सणाच्या पर्वावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जनतेची मोठी अडचण झाली. याचाच फायदा घेत खासगी बस व ट्रॅक्सीवाले जनतेची मोठ्या प्रमाणात लुट करीत आहेत. त्यामुळे जनतेला आणखी किती दिवस वेठीस धरणार, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचार्‍यांचा नक्कीच कल्याण झाला पाहिजे, त्यांची मागणी रास्त आहे, ते पूर्ण व्हायला पाहिजे. मात्र, यासाठी करोडो जनतेला वेठीस धरून हे साध्य होऊ शकत नाही. जनता ही मायबाप आहे. त्याचे हित आधी हे समजायला पाहिजे. या संपामुळे विद्यार्थी, शेतकरी, गोरगरीब मजूर, मध्यमवर्गीय जनता आदींचे हाल होत आहेत. याचाही विचार संपकर्‍यांनी केला पाहिजे. एसटी कर्मचार्‍यांनी दोन वर्षांंपूर्वी ही भूमिका का घेतली नाही ? तेव्हा ही समस्या नव्हती का ? आताच ही भूमिका घेऊन जनतेला वेठीस ठरणे म्हणजे एक राजकिय षडयंत्र असावा, असेही ते म्हटले आहे. संपामुळे जनतेला होणार्‍या त्रासापासून त्यांना मुक्त करण्याकरिता शासन कारवाई करणार की नाही. जर शासनाला एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या नसतील तर शासनाने जनतेला त्रास होणार नाही, यासाठी तत्काळ उपाययोजना करावी. तसेच जनतेला वेठीस धरणार्‍यांना वठणीवर आणले पाहिजे. एसटी कर्मचारी जनतेचे हाल लक्षात घेत नसतील तर त्यांच्या जागी नवीन भरती करून जनतेची प्रवासाची समस्या दूर करावी. आज अनेक युवक बेरोजगार असून ते रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. या युवकांना एसटीत संधी द्या. त्यांना रोजगार मिळाल्यास हजारो कुटुंबाचे भले होईल. त्यामुळे शासनाने जनतेचा विचार करून तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही डॉ. साळवे यांनी केली आहे.