कत्तलखान्यात नेणाऱ्या १३५ गोवंशाची सुटका : ५ तस्करांना अटक, ३ फरार

110

– गोवंशासह ५९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, पेंढरी पोलिसांची धडक कारवाई

गडचिरोली : तस्करी करून कत्तलखान्यात नेत असलेल्या तब्बल १३५ गोवंशाची सुटका करण्यात आली. यावेळी ५ तस्करांना अटक करण्यात आली असून ३ जण फरार झाले. यावेळी ६ वाहनांसह ५९ लाख, ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई २१ नोव्हेंबरला गोरक्षकांच्या माहितीवरून पेंढरी पोलिसांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून जवळपास १४५ गोवंश वाहनांमध्ये डांबून तेलंगणा राज्यातील कत्तलखान्यात नेण्यात येत होते. याबाबत गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीवरुन पेंढरी पोलिसांनी सापळा रचून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांना पकडले. या वाहनात ९० गायी व ४५ बैल असे एकूण १३५ गोवंश आढळून आले. या गोवंशाची पोलिसांनी सुटका केली. दरम्यान, पोलिसांना बघताच ट्रकमधील तस्करांनी वाहने सोडून जंगल परिसरात पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ५ तस्करांना अटक केली. परंतु ३ तस्कर जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईमुळे गोवंश तस्करांचेे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई पेंढरी उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी पोउपनि सागर पेंढारकर, पोउपनि मनोज बरूरे, पोहवा मडकाम, पोशी विनय, भीमराव, पेंदाम यांनी केली.  सदर घटनेचा पुढील तपास पोउपनि धम्मदीप काकडे करीत आहेत.