६८ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम थाटात

148

गडचिरोली : आंतरराष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे, जिल्हा सहकारी बोर्ड लि. गडचिरोली, सहकारी विभाग गडचिरोली व दि आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्या. गडचिरोलीच्या वतीने ६८ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघ पुणेचे संचालक तथा दि आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष घनश्याम मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवम नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोलीचे संचालक अमरसिंग गेडाम, नगरसेवक गुलाबराव मडावी, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव कोडापे, बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबधंक कैलास मडावी, आदिवासी परधान समाज बचत गट गडचिरोलीचे अध्यक्ष भरत येरमे, गडचिरोली संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण मडावी, देवल सुरपाम सचिव खुटगाव, विनोद पोहाणे सचिव नरचुली, सचिन मेश्राम सचिव गडचिरोली, लिपीक नैताम, नागोसे, नेवारे, मधुकर कन्नाके, सचिन आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकारी शिक्षणाधिकारी श्री. पी. व्ही. तलमले यांनी सहकारी सप्ताहाचे महत्त्व, ध्वजाचे महत्त्व, सहकारी चळवळीचा भूतकाळ, वर्तमानकालीन परिस्थिती व भविष्य काळातील सहकारी चळवळीबद्दलचे धोरण कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करुन ९७ व्या घटना दुरुस्तीची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांनी अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळीचे योगदान व समाज विकास यावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि नागरी जीवन ही सहकार चळवळीमुळे प्रभावित झाल्याचे चित्र आपणास आज दिसून येते. सहकार चळवळ ही मुळातच सामान्य माणसासाठी व सामान्य माणसाच्या जिद्दीतून उभी राहिलेली चळवळ असल्याचे प्रतिपादन घनश्याम मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सचिन मेश्राम यांनी केले. सदर कार्यक्रमाला संस्था सभासद व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.