मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी – भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांची मागणी

119

गडचिरोली : केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवेे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य कर कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते असेच सिद्ध होते, असे नागदेवे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.