कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे : संजय मीणा

90

– जिल्हाधिकारी यांच्याकडून आवश्यक अतिरीक्त निर्बंध लागू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यात वाढत्या ओमिक्रॉन कोविड विषाणूच्या अनुषंगाने त्यावरती नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आवश्यक अतिरीक्त निर्बंध आज जिल्हयात लागू केले. कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील बंदीस्त जागेमध्ये आयोजित होणारे सर्व कार्यक्रम जसे- विवाहसमारंभ, लग्नसोहळे, वाढदिवस सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित करताना जागेच्या आसन क्षतमेच्या कमाल 100 नागरिकांचे उपस्थितीस मर्यादा असेल. तसेच सदर कार्यक्रम मोकळया जागेत आयोजित करताना कमाल 250 उपस्थिती किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी असेल.
जिल्हयातील सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना बंदीस्त जागेकरिता 100 व मोकळया जागेकरिता 250 किंवा जागेच्या क्षमतेच्या 25% यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीतांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. वर नमुद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेमध्ये करित असतांना एकूण आसन व्यवस्थेच्या/त्या जागेच्या 50 % क्षमते इतक्या उपस्थितीस मर्यादा असेल. परंतु आसन व्यवस्था निर्धारित नसलेल्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना आयोजित जागेच्या क्षमतेच्या 25% पेक्षा अधिक उपस्थिती राहणार नाही याची दक्षता पाळण्यात यावी.
क्रीडास्पर्धा किंवा सामन्यांचे (क्रीडांगणे / बैठेखेळ) आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीस मर्यादा असेल. रेस्टॉरेंट, हॉटेल , जिम, स्पॉ, ब्युटीपार्लर, सिनेमागृहे, चित्रपटगृहे, नाटयगृहे इत्यादी ठिकाणी आसनक्षमतेच्या 50 % मर्यादेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा असेल. परंतु तेथे एकूण आसन क्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 % क्षमता याबाबतची सूचना प्रथमदर्शनी भागात लावणे संबंधित आस्थापना यांना बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्रौ 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात येत आहे.
सदर आदेशाचे पालन न करणारी /उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था/समुह यांनी साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे संजय मीणा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांनी आदेशित केले आहेत.