आरमोरी मतदार संघातील 399 माजी मालगुजारी तलावांची होणार टप्प्याटप्प्याने दुरुस्ती

161

– आमदार कृष्णा गजबे यांच्या तारांकीत प्रश्नाला मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सकारात्मक लेखी उत्तर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, कुरखेडा व कोरची या तालुक्यातील मालगुजारी तलावांची देखभाल व दुरुस्ती संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले असता आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या या तिनही तालुक्यातील ३९९ माजी मालगुजारी तलावांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंञी ना. शंकरराव गडाख यांनी सकारात्मक लेखी उत्तरातुन दिली असल्याने सदर तलावांच्या देखभाल दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात २७ डिसेंबर २०२१ रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी सभागृहात तारांकीत प्रश्नाद्वारे आरमोरी मतदार संघाच्या आरमोरी, कुरखेडा, कोरची तालुक्यातील शेतकरी माजी मालगुजारी तलावापासून होणाऱ्या सिंचनावर अवलंबून असुन सदर तलावांच्या देखभाल दुरुस्तीअभावी येथील शेतक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यासंदर्भात लक्ष वेधले होते.एकूण ६०७ माजी मालगुजारी तलांवापैकी केवळ २०८ तलावांची दुरुस्ती करण्यात आली असून उर्वरित ३९९ तलावांची दुरुस्ती व तलावावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याकरिता यावेळी सादर केली असता सदर प्रश्नाला लेखी उत्तर देताना मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यात सिंचनासाठी मोठे सिंचन प्रकल्प नसल्याने शेतकरी माजी मालगुजारी तलावापासून होणाऱ्या सिंचनावर अवलंबून असल्याची बाब मान्य केली. पुढे उत्तरात त्यांनी ६०७ माजी मालगुजारी तलांवापैकी २०८ तलावांची विविध योजनांमधुन दुरुस्ती करण्यात आली असून उर्वरित ३९९ तलावांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित करुन त्यांची अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४७.८४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तलावांच्या बुडीत क्षेत्राची मोजणी करून तलावातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आरमोरी मतदार संघातील माजी मालगुजारी तलावांच्या सिंचनावर अवलंबून असलेल्या व अनेक वर्षांपासून मामा तलावांच्या दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याकरिता मतदार संघाच्या आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचना विषयी जिव्हाळ्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल मतदार संघातील भाजपा पदाधिकारी व अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त केले.