गडचिरोली नपच्या नगराध्यक्षाच्या निवडणूक विशेष सभेला स्थगिती

89

– योगिता पिपरे ह्याच राहणार नगराध्यक्ष पदावर कायम

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2021 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही विशेष सभा स्थगित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गडचिरोली नगर परिषदेचे पीठासीन अधिकारी व सहाय्यक पीठासीन अधिकारी यांना एका पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे योगिता पिपरे ह्याच नगराध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी एका प्रकरणात गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना दोषी ठरवून अपात्रतेची कार्यवाही केली होती. त्यानुसार रिट याचिकेच्या निर्णयाच्या अधिन राहून निवडणूक विभागाने सदर पदाच्या निवडणुकीकरिता 9 डिसेंबर 2021 रोजी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र योगिता पिपरे यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नगरविकास मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल केली होती. यावर आज, 8 डिसेंबर 2021 रोजी सुनावणी पूर्ण होऊन आदेश पारित करण्यात आला आहे. सदर पारित आदेशात राज्याचे नगरविकास मंत्री यांचे 16 नोव्हेंबर 2021 रोजीचे आदेश खारीज करण्यात आलेले असून या प्रकरणात नव्याने आदेश पारित करण्यास नगरविकास मंत्र्यांकडे प्रकरण वर्गीकृत केले आहे. त्यामुळे 9 डिसेंबर 2021 रोजी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नगर परिषद गडचिरोली येथे होणारी विशेष सभा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मीणा यांनी 8 डिसेंबर 2021 च्या पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे योगिता पिपरे ह्याच नगराध्यक्षपदी कायम राहणार आहेत.