– पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले तलाठी कार्यालयाचे लोकार्पण व रस्ते, पूल बांधकामाचे भूमिपूजन
चंद्रपूर : सावली तालुका आणि परिसरात काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. पाथरी येथील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, पं. स. सभापती विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक संदीप गड्डमवार, तहसीलदार सागर कांबळे आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे सावली तालुका सिंचनामध्ये राज्यात अग्रेसर झाला आहे. गोसीखुर्दचे पाणी आसोलामेंढा येथे आणण्यासाठी आपण संघर्ष केला. अखेर हे पाणी आल्यामुळे येथील शेतकरी सुखावला. एकीकडे ही परिस्थिती असताना गत पंधरवड्यात अवकाळी पावसाने कहर केला. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसाने हिसकावून घेतला. या नुकसानग्रस्त शेतमालाची प्रशासनासोबत आपण पाहणी केली असून शेतकऱ्यांना शासनाची सर्व मदत मिळवून देऊ. त्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी राज्याचे कृषीमंत्र्यांना सुद्धा या भागात येण्याची विनंती केली असून ते येथे येणार आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त पिकाचा विषय मांडला जाईल, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.
सर्वप्रथम पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते डोंगरगाव (मस्के) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन, मंगरमेंढा येथे लहान पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेळके, पं. स. सदस्य उर्मिला तराळे, डोंगरगावचे सरपंच रेवनाथ चिनारकर, चिखलीचे सरपंच रेखा बानबले, मंगरमेंढाचे सरपंच गुरुनाथ निसार आदी उपस्थित होते.