मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी घेतली तत्काळ दखल ; प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश
विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड बुज, सामदा, वाघोली बुट्टी तसेच गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यासह इतर परिसरात अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मका पिकाची मोठी हानी झाली असून अनेक शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. माहिती मिळताच मा. खा. डॉ. माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चा डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागात त्वरीत पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे मका पिके आडवी पडून कणसांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने तूर, कापूस, सोयाबीन तसेच भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या हाती निराशा आणि चिंतेचे सावट दाटले आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चा डॉ. अशोकजी नेते यांना त्यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम, भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन कारडे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती आणि पिकांची झालेली हानी याबाबत सविस्तर अहवाल देण्यात आला. माहिती मिळताच मा. खा. डॉ. नेते यांनी तत्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागात त्वरीत पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
“मी सध्या मुंबई येथे असलो तरी माझ्या लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी माझ्या लक्षात आहेत. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
तसेच मुंबईहून परतल्यानंतर स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये मका, तूर, कापूस, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने मदतीची घोषणा करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत तसेच पिकांच्या नुकसानीची छायाचित्रे जोडून तहसील कार्यालय व कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने त्वरीत पंचनामे पूर्ण करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







