Home गडचिरोली पंतप्रधान मोदींच्या संवेदनशील नेतृत्वामुळे मूल – चामोर्शी रेल्वेमार्गाच्या मागणीला नवे बळ

पंतप्रधान मोदींच्या संवेदनशील नेतृत्वामुळे मूल – चामोर्शी रेल्वेमार्गाच्या मागणीला नवे बळ

9

– पीएमओकडून रेल्वे बोर्डाला कार्यवाहीचे निर्देश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १५ जून : देशातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित मूल – चामोर्शी रेल्वेमार्गाच्या मागणीची दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या संदर्भातील निवेदन स्वीकारून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

PMOPG/D/2026/0108268 या क्रमांकाने नोंद झालेल्या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने संबंधित निवेदन रेल्वे बोर्डाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्याकडे पाठविल्याचे कळविले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व वेग मिळाला आहे. वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे गाड्या, नवीन रेल्वेमार्ग, महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर आणि दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचविण्याच्या धोरणामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विकासाची नवी दारे खुली झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीसारख्या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या विकासासाठी मूल – चामोर्शी रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचा प्रकल्प, कोनसरी येथील लोह प्रक्रिया उद्योग तसेच भविष्यात उभारल्या जाणाऱ्या विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे या भागात मालवाहतुकीची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या बहुतांश मालवाहतूक रस्तेमार्गे होत असल्याने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर मोठा ताण निर्माण होत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. मूल – चामोर्शी रेल्वेमार्ग मंजूर झाल्यास कोळसा, लोखंड, बांधकाम साहित्य आणि औद्योगिक उत्पादनांची वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि कमी खर्चात होऊ शकणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होण्याबरोबरच जिल्ह्यात नवीन गुंतवणुकीलाही चालना मिळेल.

या रेल्वेमार्गामुळे धार्मिक पर्यटन क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. चामोर्शीजवळील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मार्कंडादेव तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास देशभरातील भाविकांना येथे सहज पोहोचता येईल. त्यामुळे पर्यटन वाढून स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक आणि युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
या मागणीसाठी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेने गेल्या दीड दशकापासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी १४ एप्रिल २०११ रोजी CMS-28404 क्रमांकाने निवेदन सादर केले होते. त्यानंतर २० एप्रिल २०११ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे संबंधित प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तेव्हापासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून आता पंतप्रधान कार्यालयाने स्वतः या विषयाची दखल घेतल्याने प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

संतोष सुरपाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, “देशाच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या मागण्यांनाही पंतप्रधान कार्यालय गांभीर्याने घेत असल्याचे या कार्यवाहीतून दिसून येते. गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि धार्मिक विकासासाठी मूल – चामोर्शी रेल्वेमार्ग अत्यंत आवश्यक असून केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आहे.” पंतप्रधान कार्यालयाने या मागणीची दखल घेतल्याने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, उद्योग क्षेत्र, व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय होऊन गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!