Home गडचिरोली माझी राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव : नगरसेवक आशीष...

माझी राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव : नगरसेवक आशीष पिपरे

27
अगरबत्ती प्रकल्पाची सीबीआय चौकशीची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली  : ‘मेक इन गडचिरोली’ च्या नावावर आपण कोणत्याही महिलांची फसवणूक केली नसून आगामी चामोर्शी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी रचलेला हा डाव असल्याचा खुलासा चामोर्शी येथील नगरसेवक आशीष पिपरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

नगरसेवक आशीष पिपरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, या प्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी स्वतःहून प्रशासनाकडे केल्याचे सांगितले आहे. माजी आमदारांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा उद्योग केंद्र, बँक ऑफ महाराष्ट्र व इतर बँकांच्या सहकार्याने ‘मेक इन गडचिरोली’ हा प्रकल्प राबविण्यात आला. याकरिता सुरुवातीला मशीनचे कोटेशन १,१८,००० रुपये देण्यात आले होते. मात्र, आपण स्वतः पुढाकार घेऊन इंडिया मार्ट व ऑनलाइन दर तपासले असता मशीन ९०,००० रुपयांत उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलांच्या हितासाठी ९०,००० रुपयांतच मशीन खरेदी करण्यात आल्या. मागील तीन वर्षांत या मशीनमधून ४-५ टन माल उत्पादन झाला असून मशीन अजूनही सुस्थितीत आहेत. याबद्दल महिलांनी स्वतः १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून दिले आहे, असेही पिपरे यांनी नमूद केले आहे.

आपल्याविरोधात तक्रार करणाऱ्या काही जणांनीच गरिबांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात अनेक पोलीस तक्रारी झाल्या आहेत. निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी ते आता निराधार महिलांची दिशाभूल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपली बदनामी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे आपण तक्रार दाखल केली असून लवकरच न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही नगरसेवक आशीष पिपरे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!