आगीत जळाल्याने ११ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

177

– शाॅर्ट सर्किटने घर व दुकान जळून खाक

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आवलमारी येथील एका घराला व दुकानाला शाॅर्ट सर्किटने आग लागली. या घटनेत एका ११ महिन्याच्या बाळाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घर व दुकानातील साहित्य जळून खाक झाले.

प्राप्त माहितीनुसार, आवलमारी येथील रमेश राहुलवार यांच्या दुकानाला शाॅर्ट सर्किटने आग लागली. यात दुकान व घरातील सामान जळाले. या घटनेत दुकानाशेजारील व्यंकटेश गग्गुरी यांचा दुकानात खेळत असलेला ११ महिन्याचा बाळ ९० टक्के जळाला. लगेच त्याला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या बचावासाठी गेलेले रमेश राहुलवार हे ३० टक्के जळाले तर त्यांची मुलगी सौम्या ही सुद्धा काही प्रमाणात जळाली असून त्या दोघांवरही आवलमारी येथील आरोग्य पथकात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे आवलमारी व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.