– खा. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचा ९ डिसेंबर २०२३ रोजी गडचिरोली दौरा असून या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भूमिपुजन करण्यात येणार आहेत. मागील दौरा १८ तारखेला होता. पण तेलगांना राज्यातील निवडणुकीत व्यस्त असल्याने रद्द झाला. पण आता माझ्याच प्रयत्नाने ९ डिसेंबर २०२३ चा दौरा निश्चित झाला असून यात कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा गडचिरोली रेल्वेलाईनचे भूमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच त्यांच्या दौऱ्यात कृषी वीजधारक शेकऱ्यांसाठी बारा तास वीज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडीच्या महामंत्री वर्षा शेडमाके, तालुका महामंत्री बंडू झाडे उपस्थित होते.






