Home गडचिरोली विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सराव शिबिर

विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सराव शिबिर

155

– ३९ आश्रमशाळांचा सहभाग ; ३३० खेळाडूंनी गाळला मैदानावर घाम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर आता २ ते ४ डिसेंबर या कालावधीत क्रीडा संकुल देवरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी गडचिरोली प्रकल्पातील सुमारे ३३० खेळाडूंनी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर कसून सराव केला. यासाठी २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसीय सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार १ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गडचिरोली प्रकल्पाचा संघ रवाना होणार आहे.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर यांनी या सराव शिबिराचे नियोजन केले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची तयारी करून घेण्यात आली.

सराव शिबिरात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील सुमारे ३३० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचा सराव करण्यात आला.

तीन दिवसीय सराव शिबिरात पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष ढबाले, नागनाथ पवार, मोहन मारबते, निलय गडे, पुरुषोत्तम बखर, बळीराम जायभाये, रविकांत पिपरे, सुभाष लांडे,अशोक परतेकी, आनंद बहिरेवार आदींसह क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सराव शिबिरादरम्यान विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या कर्मचारी व विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत करण्यात आली.

error: Content is protected !!