शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चामोर्शी येथे चक्काजाम आंदोलन

127

– अतुल गण्यारपवार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ डिसेंबर २०२२ : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते, माजी जिप सभापती तथा तालुका खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी चामोर्शी बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
धानाला १ हजार रुपये बोनस देण्यात यावे, कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात यावी, पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत उत्पादनाला हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावे, जोडधंद्यासाठी प्रोत्साहन करावे पर्यटन स्थळाचा विकास करावा आदी मागण्यांसाठी चामोर्शी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
सुरुवातीला शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अतुल गण्यारपवार, माजी पं. स. सदस्य सुरेश परसोडे, सुधाकर गद्दे, माजी जि. प. सदस्य राजू आत्राम यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी भाषणातून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडेतोड टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. या आंदोलनात मोहर्ली, फराडा, मुरखळा, मार्कंडा, सगणापूर, भेंडाळा, कळमगाव, वाघोली, दोटकुली, देवळी, तळोधी, घोट, वालसरा, भिवापूर, आमगाव (महाल) आदींसह अनेक गावातील शेतकरी सहभागी झाले होते.