वाढते अपघात रोखण्यासाठी सुरजागड व्यवस्थापनाने प्रभावी उपाय योजावेत : हंसराज अहीर

119

– जिल्हा व पोलिस प्रशासनासोबत लवकरच बैठक

विदर्भ क्रांती न्यूज
 
गडचिरोली : सुरजागड प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ओव्हरलोड अवजड वाहनांचे  दररोज एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन होते. या वाहतुकीमुळे या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य असल्यामुळे अपघातांमध्ये वृध्दी झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती न करता संपूर्ण रस्ता कवेत घेवून वाहनांची वर्दळ असल्यामुळेच कांचनपूर निवासी बिजोली जयधर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दुर्घटनास्थळास भेट दिल्यानंतर केला.
यापूर्वी सन 2019 मध्ये याच प्रकल्पातील मालवाहू अवजड वाहनाने एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली-करेम मार्गावर एस. टी. बसला धडक दिल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यावेळीही  संतप्त नागरिकांनी वाहनांची जाळपोळ केली होती. सदर प्रकार समर्थनीय नसला तरी परिस्थितीनुसार ती प्रतिक्रिया होती. त्यामुळे असे प्रकार टाळण्याकरिता सुरजागड प्रकल्प प्रबंधन पोलिस व जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेवून योग्य उपाययोजना वेळीच केल्या असत्या तर मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला आपले प्राण गमवावे लागले नसते व संतप्त जमावाकडून वाहनांची राखरांगोळी झाली नसती असेही हंसराज अहीर यांनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे. या परिसरातील शाळेकरी विद्यार्थ्यांच्या जीविताला सुध्दा 24 तास चालणाऱ्या या वाहतुकीमुळे धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने शाळा सुुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर सुरजागड प्रकल्पातून होणारी वाहतूक बंद करण्याची व वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याची सूूचना अहीर यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केली.
मृतक महिलेच्या निवासस्थानी जावून कुटूंबियांचे सात्वंन
दुर्घटनास्थळी भेट देवुन हंसराज अहीर यांनी मुलचेरा तहसीलमधील कांचनपूर गावास भेट देवुन मृतक महिलेच्या कुटूंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या समस्या सांगितल्या. जडवाहनधारक मनमानीपणे वाहने चालवून लोकांच्या जिवीताला धोका पोहचवित असल्याची तक्रार केली. यावेळी अहीर यांनी या गंभीर प्रश्नांबाबत लवकरच गडचिरोली जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधिक्षकांशी स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेवून उपाययोजना बाबत चर्चा करु असे आश्वासन दिले.
यावेळी भाजप प्रदेश आदिवासी आघाडी सदस्य संदीप कोरते, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, गोंडपिपरी भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, अमर बोडलावार, साईनाथ माष्टे, सुभाष गणपती, बासु मुजूमदार, वैष्णव ठाकूर, अमित अधिकारी, दयाल मंडल, सुशील खराटी, विशाल मंडल, तपन राय, सुभाष दास यांची उपस्थिती होती.