एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश : पोलीस अधीक्षक अंकित गोयल

187

– कापेवंचा जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमक

– घटनास्थळावरुन रायफल व नक्षल साहित्य जप्त, नक्षल मृतदेह पोलिसांनी केले हस्तगत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­ऱ्या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यात एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आलेे आहे. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असून नक्षलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची मााहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी आज, 30 सप्टेंबरला येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

माहिती देताना पुढे ते म्हणाले, विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठ्या प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक 28/09/2022 रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहितीवरुन कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दिनांक 28/09/2022 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 30 ते 40 नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरू असून जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळावर 1 नक्षल मृतदेह मिळून आले. तसेच मृतदेहासोबत 8 एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे. ऑक्टोबर 2020 रोजी पासून ते आतापर्यंत एकूण 55 नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून, 46 नक्षलवाद्यांना अटक केली असून 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केेल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.

सदर अभियान आपण स्वतः आणि अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी कौतुक केले असूूून नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.