Home गडचिरोली गडचिरोली पोलिसांनी चारचाकी वाहनासह पाऊणेनऊ लाखांची दारू केली जप्त

गडचिरोली पोलिसांनी चारचाकी वाहनासह पाऊणेनऊ लाखांची दारू केली जप्त

51

– आलापल्ली येथील घटना

– वाहन चालकाला अटक, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन आज, 07 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पथकाने आलापल्ली (ता. अहेरी) येथे सापळा रचून अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळाली की, काही इसम आलापल्ली येथे चारचाकी वाहन क्र. एम एच 20 ई जे 5272 ने अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतूक करणार आहेत, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पोलीस पथकाने सावरकर चौक आलापल्ली येथे सापळा रचला असता वरील वर्णनाप्रमाणे असलेले संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसून आल्यावर पोलीसांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा करुन वाहनास रस्त्याच्या कडेला थांबविले. त्यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनातील चालकाला त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव पंकज अशोक शर्मा (रा. चंद्रपूर, जि. चंद्रपूर) असे सांगितले.

त्यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 1) 90 एम एल मापाचे संत्रा देशी दारूचे 31 बॉक्स, एकूण 3100 नग एकूण किंमत 2,48,000/ रुपये, 2) दोन लिटर क्षमतेचे रॉयल स्टॅग व्हिस्कीचे 07 बॉक्स, एकूण 42 बॉटल एकूण किंमत 1,47,000/ रुपये, 3) 500 मिली मापाचे हेवर्ड बियरचे 14 बॉक्स, एकूण 336 नग बियर एकूण किंमत 100800/रुपये, 4) दोन लिटर क्षमतेचे ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 02 पेट¬ा, एकूण 12 बॅरल एकूण किंमत 42,000/रुपये, 5) 500 मिली मापाचे ट्यूबर्ग बियरचे 03 बॉक्स, एकूण 72 नग बियर एकूण किंमत 21,600/रुपये असा देशी व विदेशी दारुचा अवैध मुद्देमाल मिळून आला. यावरुन सदर मुद्देमालासह 6) देशी विदेशी दारु वाहतूक करिता वापरण्यात आलेली चारचाकी वाहन क्रमांक एम एच 20 ई जे 5257 एकूण किंमत 3,00,000/रुपये व 7) रेडमी कंपनीचा मोबाईल एकूण किंमत 10,000/ रुपये असा एकूण 8,69,400/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाबाबत वाहन चालक पंकज शर्माकडे अधिक विचारपूस केली असता, तो स्वत: व सुलतान शेख दोघेही रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर यांनी मिळून सदरचा मुद्देमाल हा किशोर डांगरे व पप्पी झोरे, दोघेही रा. आलापल्ली, जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरुन आलापल्ली येथे आणला, असे त्याने सांगितले.

यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे अहेरी येथे कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे 1) पंकज अशोक शर्मा, रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर, 2) सुलतान शेख, रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर, 3) किशोर डांगरे, रा. आलापल्ली जि. गडचिरोली व 4) पप्पी झोरे, रा. आलापल्ली, जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी चालक पंकज अशोक शर्मा याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी पंकज शर्मा याला मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अहेरी यांच्या समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले, पोस्टे अहेरी हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, चापोशि/दिपक लोणारे यांनी पार पाडली.

error: Content is protected !!