विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : धानोरा वनपरिक्षेत्रातून महिंद्रा पिकअप वाहनातून सागवान लाकडाची अवैध तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच, वन विभागाच्या पथकाने पवनी ते धानोरा मार्गावर सापळा रचून तिघांना रंगेहाथ अटक केली. वन विभागाने पिकअप वाहनासह सुमारे २ लाख ०३ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
वन परिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार आणि त्यांच्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकाला धानोरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२० मध्ये पवनी ते धानोरा मार्गावरील रोपवाटिकेजवळ सागवान लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी पिकअप वाहनाला थांबवून तपासणी केली आणि चालकाकडे लाकूड वाहतुकीचे कागदपत्रे विचारले. परंतु, त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. त्यानुसार शेख मोहीन शेख सत्तार (रा. धानोरा), अब्दुल हिफजान असांरी (रा. शांतीनगर बरघाट, सिवनी, मध्य प्रदेश), मंगेश सेयनु गावळे (रा. डब्बा (दराची), ता. धानोरा) या तीन आरोपींना अटक करण्यात आली:
वन विभागाने आरोपींच्या ताब्यातून महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक CG 04 QL0325) आणि २ लाख ३ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे. आरोपींविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना वनकोठडीत ठेवण्यात आले आहे. गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, उपवनसंरक्षक आर्या व्हि. एस., सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी सुमित दि. पुरमशेट्टीवार आणि त्यांच्या अधिनस्त वनकर्मचारी पुढील तपास करत आहेत.






