Home गडचिरोली गडचिरोली येथे ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली येथे ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रमाचे आयोजन

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कर्तव्य कक्ष क्रमांक 1 गडचिरोली येथे भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेती क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रे आणि नव्या घडामोडी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भारतीय किसान संघ विभाग प्रमुख रामकृष्णाजी तामशेट्टीवार, किसान संघ जिल्हा प्रमुख उदयजी बोरावार, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, तालुकाध्यक्ष दत्तूजी सूत्रपवार, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री मनमोहनजी बंडावार, जिल्हा महामंत्री बंडूजी झाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेती तज्ज्ञांशी थेट संवाद, शंकांचे निराकरण आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाची संधी शेतकऱ्यांना मिळाली. कार्यशाळेत पर्यायी पिके, आधुनिक फळबागा तंत्रज्ञान, पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, कोरडवाहू शेतीसाठी यंत्रसामग्री व जोडधंदे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर्षी विशेष उपक्रम म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून, शेती क्षेत्रात नवे युग घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात आले.

21 ते 24 नोव्हेंबरला नागपुरात कृषी प्रदर्शन

21 ते 24 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात नवनवीन यंत्रे, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नव्या घडामोडीची माहिती व शेतीविषयक विविध अत्याधुनिक तंत्राची माहिती देण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!