– सावलीत भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात
– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
सावली, १ नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षावर परिसरात जनतेचा दृढ विश्वास आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विकासकामामुळे आणि जनतेच्या हितासाठी चाललेल्या कार्यपद्धतीमुळे आज अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला याचा मला अत्यंत आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.
सावली येथील पंचायत समिती परिसरात आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नव्याने पक्षात दाखल झालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांची विशेष उपस्थिती होती.
चंद्रशेखरजी बावनकुळे पुढे म्हणाले, काँग्रेसमध्ये काम करताना ‘हेवे दावे चालते. नेतृत्व एकमेकांना मान्य नाही, एकमेकांकडे पाहत नाहीत. काँग्रेसमध्ये मतभेद आणि कामावरून वाद आहेत. या क्षेत्राचे खासदार जनतेची दिशाभूल करून आरक्षण व संविधानाच्या नावाखाली खोट्या आश्वासनांनी मते मिळवली. मात्र, निवडून आल्यावर जनतेला सोडून दिले आहे. आज ते या क्षेत्रात फिरतही नसून जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते हे मात्र नेहमी जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसवाल्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ही योजना सुरू राहीलच, असा माझा विश्वास आहे. निवडणुकीत महिलांना महिन्याला खटाखट रुपये देऊ असे खोट बोलून तसेच संविधान बदलवण्याचे खोटे आरोप काँग्रेस करत असली, तरी भाजप सत्तेत असूनही संविधान अबाधित आहे आणि राहील, असेही बावनकुळे म्हणाले. या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.
विजयाचा संकल्प करूया : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते
याप्रसंगी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते बोलताना म्हणाले, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाचा संकल्प करून कामाला लागा. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोदिया हा धान्य उत्पादक पट्टा असून या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे धान्य नष्ट झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर प्रामुख्याने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ (किर्तीकुमार) भांगडिया, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार तथा पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख सुधाकरजी कोहळे, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी समाजाचे नेते डॉ. अशोकजी जिवतोडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवीजी शिंदे, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर, माजी जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कार्यक्रमाचे आयोजक व स्वतः भाजपात प्रवेश करून अनेकांना पक्षात आणणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार, राज्य परिषद सदस्य राजू देवतळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जि. प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपलीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वंदना शेंडे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, संजय गजपुरे, गणेश तर्वेकर, आवेश पठाण, देवराव सावकार मुद्दमवार, अर्जुन भोयर, देविदास बानबले, नीलम सुरमवार, छाया चकबंडलवार, सतिश बोम्मावार, सचिन तंगडपलीवार, नितीन कारडे, आशिष कार्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशासाठी कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा
या भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याच्या यशासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाने अपार परिश्रम घेतले. संपूर्ण सावली परिसरात भाजपाचा झेंडा फडकत, घोषणांनी दुमदुमला. जनतेच्या उत्साहाने या कार्यक्रमाला यशस्वीतेचा नवा उत्साह संचारला.







