धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव उधळून लावा : भाई रामदास जराते

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रातील भाजप सरकार काही लोकांना पुढे करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजानचे भोंगे, हनुमान चालीसा, जय श्रीराम जय हनुमान हे जनतेचे प्रश्न नसून महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे हक्क, आर्थिक तरतूद यासारखे कळीचे प्रश्न आवासून जनतेसमोर उभे आहेत. त्यामुळे जनतेने आपले प्रश्न सोडविण्यासाठी सतर्क राहून धर्मांध प्रवृत्ती नामोहरम केले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान पढो, आगे बढो उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय कोचे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रतिक डांगे, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, जयश्री वेळदा, विनायक कुनघाडकर, क्रिष्णा वाघाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, आज देशात पराकोटीची महागाई, बेरोजगारी पसरलेली असताना या विषयावर उपाययोजना न करता तसेच या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात त्याचेच परिपाक म्हणून मशिदिवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा अशा वादाला मनसेच्या आडून भाजपने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले आहे. देशातील सर्व जातीधर्म गुण्यागोविंदाने नांदत असताना मतांच्या ध्रुवीकरणाच्या नादात देशाची एकात्मता आणि शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्नाविरोधात प्रागतिक पक्ष आणि संघटना शेवटपर्यंत लढत राहतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज बन्सोड यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक डांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाई अक्षय कोसनकर, रजनी खैरे, खुशाली बावणे, धारा बन्सोड, सुनंदा हजारे, विमलबाई क्षीरसागर, दीपिका डोंगरे, कन्हैया गेडाम यांनी परिश्रम घेतले.