गडचिरोली जिल्ह्यातील लोहखाणी विरोधातील संघर्ष संसदेत पोहचविणार : माकपचे राष्ट्रीय महासचिव काॅ. सिताराम येचुरी यांचे आश्वासन

126

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडसह २५ लोहखाणी प्रास्तावित करुन स्थानिक आदिवासींना वनहक्क व पेसा कायद्याने मिळालेल्या हक्कांवर गदा आणणे दुर्दैवी असून याविरोधात स्थानिकांचा सुरू असलेला खदान विरोधी आवाज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या खासदारांच्या मार्फतीने संसदेत बुलंद करतील, असे आश्वासन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव काॅ. सिताराम येचुरी यांनी दिले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.राजेंद्र कोरडे, भाई प्रा. एस. व्ही. जाधव, भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, भाई शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज नागपूर येथे काॅ. सिताराम येचुरी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड सह संपूर्ण‌‌‌ २५ लोहखाणी कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी खाण विरोधी बाजू समजून घेवून सदरचे आश्वासन दिले.

यावेळी काॅ. सिताराम येचुरी म्हणाले की, वनहक्क कायदा होण्यासाठी माकप, भाकपसह डाव्या पक्षांच्या खासदारांनी त्यावेळी देशातील आदिवासी आणि परंपरागत वननिवासींची बाजू रेटून धरली होती. आज त्याच कायद्यांना धाब्यावर बसवून ग्रामसभांच्या विरोधानंतरही खाणी खोदल्या जाणे दुर्दैवी असून याविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाज बुलंद करण्यासाठी माकपचे खासदार पुढाकार घेतील, असेही आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते भाई चंद्रकांत भोयर, सरपंच दर्शना भोपये, ग्रा. पं. सदस्य कविता ठाकरे, रेवनाथ मेश्राम, सुषमा बोरकर, अशोक किरंगे, विनोद लटारे, रजनी खैरे, यादवप्रसाद कौशल, सुनिल बन्सोड, गोपीनाथ ठाकरे, देवेंद्र लाटकर, कुसूम नैताम, माकपचे तुलाराम नेवारे, नरेश पिल्लारे, विठ्ठल प्रधान, हरिदास मोगरकर, ईश्वर रेचनकर, दामोधर जराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.