गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार

259

– सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू व्हावे यासाठी सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिसभेत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मंजुरी दिली असून गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा प्रसार आणि प्रचार करून विद्यार्थी व समाज विकासासाठी हातभार लागणार आहे. शिवाजी महाराजांचे जीवन कार्य समाजाला मार्गदर्शक असल्याने त्यांचे जीवन कार्य व त्यांच्या स्वराज्य निर्मिती संबंधित असणाऱ्या बाबीवर संशोधन करणार्‍यांना या अध्यासन केंद्राचा फायदा होणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानत होते. एक लोककल्याण कल्याणकारी राजा म्हणून त्यांचे कार्य जगाला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच तरुणाईमध्ये साहस व प्रेरणा संचारते. शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, अर्थ व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन, स्थापत्य कौशल्य, पायाभूत व्यवस्था उभारण्याची पद्धत, कुशल कार्यबल तयार करण्याची पद्धत, सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी, दूरदृष्टी, मुसद्दी पणा, आरमार, गनिमी कावा, बदलीचे धोरण, कामाचा मोबदला देण्याची पद्धत, स्त्रीविषयक आदर, लोकशाही, समता, न्याय, स्वतंत्रता, तसेच जात, धर्म व वंश या सर्व दुय्यम गोष्टींच्या पलीकडे जाऊन हा पराक्रमी माणुसकीचा झरा असलेला राजा प्रत्येकाला, तरुणाईला आपला वाटतो. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा, हा केवळ महान युगपुरुषच नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणात आणणाऱ्या महात्मा सारखे ते वंदनीय थोर पुरुष होते. शिवाजी महाराजांचे कार्य युवकांना दिशा देणारे व त्यांच्यात जग जिंकण्याची प्रेरणा निर्माण करणारे आहे. यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक, यशस्वी नेता आणि आदर्श राज्य घडविण्यासाठी त्यांचे कार्य दिशादर्शक ठरणारे आहे. नवीन विद्यार्थी अभ्यासक आणि इतिहासकारांना या अध्यासन केंद्राचा लाभ होईल, असे प्रा संध्या येलेकर यांनी आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे.