समाजात महिला – पुरूष समानता आणणे गरजेचे : जिल्हाधिकारी संजय मीना

130

– जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात महिला मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

– जागतिक महिला दिनी ५१ कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्याच्या घडीलासमाज जीवनाची सर्वच क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केलेली आहेत. महिला आज अनेक क्षेत्रात पुरूषांच्याही पुढे गेलेल्या दिसताहेत. तरीदेखील बऱ्याच ठिकाणी महिला- पुरुष समानता दिसून येेत नाही. हा बदल घडवून व मानसिकता बदलवून महिला – पुरूष समानता आणली पाहिजे. तरच खऱ्याअर्थाने महिलांचा सन्मान होईल, असे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात महिला मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, समानतेचा पाया अधिक मजबूत करणे हे आंगणवाडी कार्यकर्ती आणि शिक्षण क्षेत्रातील महिलांच्या हाती आहे. त्या प्रथम शिक्षिका आहेत, माता आणि महिलाही आहेत. पायाभूत शिक्षण हे त्यांच्या हातात आहे. बदल हे शिक्षणातूनच शक्य आहेत, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी जिपचे मुख्य कार्यपालन आधिकारी कुमार आर्शीवाद यांनी कुपोषण कमी करण्यासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतूक केले. या कार्यक्रमाला जिपच्या महिला बालकल्याण सभापती रोशनी पारधी, समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी आर. एम. भुुयार, महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी ए. के. इंगोले, जि. प. सदस्य ऍड. राम मेश्राम, मनीषा दोनाडकर, एस. सी. येलमुलवार, माजी अध्यक्ष योगिता भांडेकर, टी. डी. कौशी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी अशा ५१ कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.