मतदानाच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करा : प्राचार्या डॉ. शारदा महाजन

116

– नमाद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : भारतीय संविधान निर्मात्यांनी वयाची विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन आपले शासनकर्ते निवडण्याचा अधिकार प्रदान केला आहे. चांगल्या लोकप्रतिनिधीमुळे आपली लोकशाही बळकट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा नैतिकतेने वापर करून लोकशाही मजबूत करण्याचे कार्य करावे, असे आवाहन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी सर्वप्रथम उपस्थितांना मतदार जागरूकतेची शपथ दिली. प्राचार्या डॉ. महाजन पुढे म्हणाल्या, मतदाराच्या सहभागावरच लोकशाहीचे यशापयश अवलंबून आहे. मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडणे म्हणजे लोकशाहीच्या विकासात योगदान देणे होय. प्रत्येक मतदाराने विवेकाने मताधिकाराचा उपयोग करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा. सोबतच प्रत्येकाने आपल्या परिसरात मतदार जागृतीचे कार्य करावे, असेही आवाहन प्राचार्या डॉ. महाजन यांनी केले. राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमात कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सर्वांंनी कोविड १९ च्या नियमांचे पालन करून या महामारीला हद्दपार करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर वासनिक यांनी केले. यावेळी महाविद्यालीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.