मागील 5 वर्षांतील आपल्या कार्यकाळात गडचिरोली शहरात वैविध्यपूर्ण विकासकामे पूर्णत्वास : नगराध्यक्ष योगिताताई पिपरे

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील 5 वर्षांतील आपल्या कार्यकाळात गडचिरोली शहरात वैविध्यपूर्ण विकासकामे पूूर्णत्वास आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला असून कोट्यवधींचा निधी खेचून आणला. मागील ३० वर्षांत जी विकासकामे झाली नाहीत ती विकासकामे ५ वर्षांच्या कारकिर्दीत झाल्याने गडचिरोली शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी सांगितले. गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून योगिताताई पिपरे यांच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीचा आज शेवटचा दिवस होता. त्या निमित्ताने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पुढे नगराध्यक्ष पिपरे म्हणाल्या की, २०१६ मध्ये पहिल्यांदाच गडचिरोली नगर परिषदेत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच शहरातील समस्या जाणून घेऊन विकास कामांना सुरुवात केली. नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत शहरात ९६ कोटी ५० लाखांचे भूमिगत गटार लाईनचे काम करण्यात आले. 15 कोटींची विविध प्रभागात सिमेंट- काँक्रीट रस्ते व नाली बांधकाम केले. 3 कोटींची शहरातील आठवडी बाजारात सुसज्ज दुकान गाळे बांधकाम केले असून 1.7 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आली. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६७ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीतून १५१९ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी १५० घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून उर्वरीत घरकुलांचे बांधकाम सुरू आहेत. विसापूर येथे २ कोटी ६५ लाख रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे 25 वर्षांपासूनची जनतेची पाण्याची समस्या आपल्या कार्यकाळात दूर झाल्याचे नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी सांगितले.

शहरात १२ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून प्रशासकीय इमारत, फायर ब्रिगेड इत्यादी कामे मार्गी लागली. लांझेडा येथे अडीच कोटी रुपयांचे बगिचाचे काम सुरु करण्यात आले. परंतु महाविकास आघाडी सरकारने निधी न दिल्याने हे काम अपूर्ण असल्याचे त्या म्हणाल्या. सुभाष वॉर्ड व विसापूर वॉर्ड येथे 6 कोटी रुपयांचे जलकुंभ व वाढीव पाईपलाईनचे काम केले. या व्यतिरिक्त शहरात विविध विकासकामे केल्याचे योगिताताई पिपरे यांनी यावेळी सांगितले.

भाजपाच्या काही असंतुष्ट नगरसेवकांनी आपल्या विरोधात तक्रार केल्याने नगरविकास मंत्रालयाने आपणास दोनदा अपात्र केले. परंतु उच्च न्यायालयाने मंत्रालयाचा आदेश रद्द करून मला न्याय दिला. पुढे आपणास तिसऱ्यांदा अपात्र करावे म्हणून याच नगरसेवकांनी प्रयत्न चालविला. परंतु काहीही सफल होऊ शकले नाही, असेहीे योगिताताई पिपरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नगरसेवक ऍड. नितीन उंदिरवाडे, नगरसेविका वैष्णवी नैताम, देवाजी लाटकर, विलास नैताम उपस्थित होते.