– बोटेकसा येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती व सल्ला गांगरा बुढालपेन यांच्या पुतळ्याचे अनावरण
– कार्यक्रमाला आमदार कृष्णाजी गजबे , माजी आमदार आनंदरावजी गेडाम, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी समाज जल जंगल जमीन यावर अवलंबून आहे. परंतु त्याला आपला विकास करण्यासाठी आता पुढे यावे लागेल. आपल्या ग्रामसभांच्या विकासाच्या माध्यमातून आपला व देशाचा विकास साधावा, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बोटेकसा तालुका कोरची येथील क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती व सल्ला गांगरा बूढालपेन यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कोया पूनेम सम्मेलन व समाज प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी केले.
यावेळी मंचावर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार आनंदरावजी गेडाम, गडचिरोली विधानसभाचे माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, आदिवासी संघाचे नेते नंदूभाऊ नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आदिवासी गोंड समाज सर्कल बोटेकसाच्या सौजन्याने गोंडवाना गोटुल भूमी बोटेकसा तालुका कोरची येथे दिनांक ८ व ९ जानेवारी असे दोन दिवसीय कोया पूनेम संमेलन व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींना आपल्याच हक्काच्या वनहक्क पट्ट्यासाठी झगडावे लागते. ग्रामसभांचे नियोजन नसल्याने आपल्याच विकासासाठी ग्रामसभांना संघर्ष करावा लागतो. कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही. त्यामुळे आपल्या समाजाला एक होऊन संघर्ष करावा लागेल त्यातून आपल्या ग्रामसभांचा विकास करून घ्यावा लागेल. ग्रामसभांचा विकास झाल्याशिवाय आपला व आपल्या देशाचा विकास होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी आदिवासी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले असून देशाला विकासाची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्या सर्वांना मोदीजींच्या “सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास” या विकास मंत्रावर चालावं लागेल व त्यातून आपला विकास घडवून आणावा लागेल असे ते म्हणाले.
आपल्या समाजाला जल, जंगल जमीन सोबतच व्यवसाय, उद्योग उभारावा लागेल. त्यातून आपल्या समाजातील बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने समाजातील लोकांना पुढे यावे लागेल. त्याकरिता मार्ग जरी खडतर असले तरी प्रयत्न करून आपल्याला मार्ग काढता येतील त्यासाठी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांचा आदर्श ठेवून आपण काम करावे, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले.